ठाणे , 30 जून (हिं.स.) विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. यावेळी तीनही मतदार संघाच्या मतमोजणी संदर्भात प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी श्री. चोक्कलिंगम यांनी केली.
यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रत्नागिरी चे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रायगड चे किशन जावळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते.
यावेळी नगर परिषद संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, उपायुक्त विवेक गायकवाड यांनी मतमोजणी साठी नियुक्त अधिकारी,कर्मचारी यांना प्रत्यक्ष मतमोजणीची माहिती दिली.
प्रशासनाने मतमोजणी साठी केलेल्या तयारीची पाहणी करून तसेच प्रशिक्षणाची तयारी पाहून श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, विधानपरिषदेसाठीचे ही मतमोजणी वेगळी आहे. त्यामुळे परिपूर्ण कारण असल्याशिवाय मतपत्रिका अवैध ठरवू नका. तसेच मतपत्रिका वैध- अवैध ठरविताना काळजी घ्यावी. मतमोजणी प्रक्रियेसंबंधी अधिक माहितीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक नियमावलीचे अवलोकन करावे.
मत मोजणीच्या ठिकाणी प्रवेशासाठी अधीकृत पत्रकारांना प्रधिकार पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी प्रधिकार पत्र अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप सारख्या वस्तू नेणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. याची सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी नोंद घ्यावी. कृपया मतमोजणी कक्षात अशा वस्तू सोबत आणू नये आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे.