सोलापूर – ग्रामीण भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी सुरू आहे, याची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाला भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी घरकुल लाभार्थ्याच्या घरी भेट दिल्यानंतर ‘घर खूपच चांगले बांधले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर आजोबांनी घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले. या संवादातून घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव समोर आला.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत झालेल्या या दौऱ्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास आणि घरकुल योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बोरामणी येथील ‘ड’ श्रेणीतील उर्दू प्राथमिक शाळेला भेट देऊन कुशल जैन यांनी वर्गखोल्या, भौतिक सुविधा आणि शाळेतील अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून आत्मविश्वासाने संवाद साधल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले.
अंगणवाडीतील बालकांना दिला जाणारा पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि विविध उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधसाठा, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा आणि आरोग्य सेवांची पाहणी केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या दौऱ्यामुळे शासकीय योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील स्थिती, ग्रामीण सुविधांमधील त्रुटी आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
चौकट
दुष्काळ निवारणासाठी सतर्क राहण्याचे निर्देश
गावातील घरकुल लाभार्थ्यांच्या निवासस्थानांना भेट देऊन बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यासोबतच दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याची मागणी प्राप्त होताच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, तसेच जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आधीपासून नियोजन करावे, अशा सूचना गटविकास अधिकारी राऊत यांना कुशल जैन यांनी दिल्या.
Post Views: 5