धाराशिव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रश्न महत्वपूर्ण प्रश्न आता निकाली निघाला आहे. जलसंपदा विभागाच्या ताब्यातील उर्वरित ३.०५ हेक्टर जागा महसूल खात्याकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे. धाराशिव-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ११.६३ हेक्टरपैकी ५.३० हेक्टर जागा यापूर्वीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे धाराशिव येथे अद्ययावत वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाच्या सिंचन वसाहतीतील जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया यापूर्वीपासून सुरू होती. २७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागाच्या वसाहतीमधील ६.०५ हेक्टर जागेपैकी तीन हेक्टर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कायमस्वरूपी देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार गट क्रमांक ३६७/१, ३६७/२ आणि ३६७/३ मधील तीन हेक्टर जागा बांधकामासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यापूर्वीच कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, महाविद्यालयाच्या व्यापक उभारणीसाठी आणखी ३.०५ हेक्टर जागेची आवश्यकता होती. ही उर्वरित जागा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कायमस्वरूपी विनामूल्य हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाकडे प्रत्यर्पित करण्याचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे. याच शासन निर्णयाद्वारे यापूर्वी हस्तांतरित केलेल्या तीन हेक्टर जागेचे विनामूल्य हस्तांतरण करण्यासही मान्यता देण्यात आली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जागेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागला असून, प्रस्तावित अद्ययावत वैद्यकीय शिक्षण संकुलाच्या उभारणीला त्यामुळे आता गती मिळणार आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानंतर प्रत्यक्ष जमीन वाटप करताना कोणता निश्चित भूभाग हस्तांतरित करावयचा, याचे आरेखन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सल्ल्याने धारशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करायचे आहे. त्यानंतर मोजणी करून जमीन हस्तांतरणाची पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
४३५ कोटींच्या निधीची यापूर्वीच मंजुरी
जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी आपल्या महायुती सरकारने यापूर्वीच ४३५ कोटी रुपयांच्या निधी मंजुर केलेला आहे. आता जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने अद्ययावत वैद्यकीय शिक्षण संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला गती मिळणार आहे. या नवीन वैद्यकीय शिक्षण संकुलामुळे धाराशिव जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा विस्तारण्याबरोबरच रुग्णसेवेच्या पायाभूत सुविधांनाही बळकटी मिळणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक सक्षम स्थानिक पर्याय उपलब्ध होण्यास तसेच नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या सुविधा विकसित होण्यास यामुळे मदत होईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.





















