बार्शी – नगरपरिषद, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी बाजार समिती, बार्शी पंचायत समिती आणि भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत मैदानावर सुरू असलेल्या भगवंत महोत्सवात पाचव्या दिवशी गायक आनंद शिंदे यांनी सुमधुर आवाजात सादर केलेल्या भावगीते, भक्तिगीते आणि महापुरुषांवरील प्रेरणादायी गीतांना बार्शीकरांनी दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी देणगीदार व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांच्या हस्ते श्री भगवंताची आरती करण्यात आली. यावेळी दि बार्शी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गांधी, मैनोद्दीन तांबोळी, हेमंत जाधव, लाडू शिंदे, समाधान पाटील, प्रदीप गायकवाड, रवींद्र राऊत, नासिर शेख, सिकंदर शेख, सावळा शिंदे, महेश यादव, विकास धारूरकर, महेश बाफना, पांडुरंग वाणी, लखन रजपूत, मिटू गाडे आदींचा सत्कार करण्यात आला.
महोत्सवाचे संकल्पक तथा माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, पंचायत समिती उपसभापती संतोष निंबाळकर, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्यासह विविध आयोजक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आनंद शिंदे यांनी “पाऊले चालती पंढरीची वाट”, “दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर”, “कुणी नाही केलं भलं, माय माझ्या भीमाने केलं”, “तू लाख हिफाजत करले”, “नवीन पोपट हा”, “उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली”…. यांसारखी लोकप्रिय गीते सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि प्रतिसाद यामुळे भगवंत महोत्सवाची रंगत अधिकच वाढत आहे.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर म्हणाले, महोत्सवाचे संकल्पक राजेंद्र राऊत यांनी महोत्सवात ग्रामीण भागातील आम्हा सर्वांना सहभागी करुन घेतले. त्यामुळे भगवंत महोत्सव हा केवळ शहराचा नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा महोत्सव झाला आहे.
























