सोलापूर : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या ज्ञान, भक्ती आणि समतेच्या विचारांचा जागर करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोलापुरात मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहात होणार आहे, अशी माहिती महापालिका स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती – लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळा’ या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा लोकसंस्कृतीशी असलेला अनुबंध विविध कलाविष्कारांतून उलगडला जाणार आहे. ज्ञान, भक्ती आणि स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना लोककला व सांस्कृतिक सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. या सोहळ्यात पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, अक्षता सावंत, जितेंद्र तुपे, कृष्णाई उळेकर, भूमिजा पाटील, जुई तनपुरे आणि शीतल पाटील हे कलावंत सहभागी होणार आहेत.कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, सोलापूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असून, संतपरंपरा, वारकरी संप्रदाय, भक्ती, ज्ञान आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असे सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस नगरसेविका अर्चना वडनाल, सुधा अळळीमोरे आदी उपस्थित होते.
————————
Post Views: 4