पंढरपूर – शेळ्या चोरी प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने जेरबंद करुन त्यांच्याकडून एकूण सहा शेळ्या, एक विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि एक टेम्पो असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडे चौकशी करीत असताना इतर पाच गुन्हांचा छडा देखील लावण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या बाबतची हकीकत अशी की पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी येथे २ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात-चोरांनी लक्ष्मी टाकळी गावातून शेळ्या चोरून नेल्या होत्या, तसेच १२ जानेवारी २०२६ रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली होती.
दरम्यान समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे त्या बाबत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना सोबत घेऊन उमदी (ता.जत,जि.सांगली) येथे जाऊन सखोल तपास केला असता शेळ्या चोरी प्रकरणी माधुरी भानुदास चव्हाण (वय ३८,रा. माळीनगर ), अंबिका सोमनाथ काळे (वय ३८रा.सवतगाव, ता.माळशिरस ) यांचे कडे तपास करून तिसरा आरोपी उदय विजय काळे (वय २१,रा.सवतगाव) यांना ताब्यामध्ये घेऊन यांच्या कडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुन्ह्यातील सहा शेळ्या, एक विवो कंपनीचा मोबाईल व एक टेम्पो आणि रोख रक्कम असा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी तपासात वरील संशयीत आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी उदय विजय काळे याचे ताब्यातून एकूण चार शेळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्या फिर्यादी समाधान बाबर यांनी आपल्याच असल्याच्या खात्रीने ओळखलेले आहेत. या प्रकरणातील उदय काळे हा संशयीत आरोपी सध्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत आहे.
दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, एपीआय शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, एएसआय रमेश बनसोडे, आबासाहेब शेंडगे, सुधाकर हेंबाडे, संजय गुटाळ, सागर गवळी, महिला पोलीस चोपडे आणि चालक पोलीस हसन नदाफ, विलास घाडगे यांनी पार पाडली.
























