पंढरपूर – पंढरीच्याच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित, कवठेकर प्रशालेने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी परीक्षेत प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाच्या श्रेणीत येत घवघवीत यश संपादन केले आहे.प्रशालेची विद्यार्थिनी कु. श्रावणी इनामदार हिने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक, तर कु. आराध्या पवार हिने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून कवठेकर प्रशालेच्या शैक्षणिक दर्जाचा दबदबा निर्माण केला आहे.
कवठेकर प्रशालेमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इयत्ता ५ वी ते ९ वी च्या इंग्रजी परीक्षेची परंपरा गेल्या ५० वर्षांपासून अविरत सुरू आहे. अनेक विद्यार्थी राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून उत्तम यश मिळवतात, याहीवर्षी प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी थेट राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवून ५० वर्षांच्या या परंपरेला खऱ्या अर्थाने उत्तुंग गवसणी घातली आहे.
या देदीप्यमान यशाबद्दलचा गौरव सोहळा पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र.पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. विश्वासे,पर्यवेक्षक श्री. गडदे व या परीक्षेबद्दल मार्गदर्शन करणारे सर्व इंग्रजी विषय शिक्षक उपस्थित होते.
”हे यश केवळ विद्यार्थिनींचे नसून संपूर्ण इंग्रजी विभागाच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. मागील ५० वर्षांची ही ज्ञानसाधना आज राज्यस्तरावर चमकली आहे.” असे गौरव उद्गार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद साचिव सु.र.पटवर्धन यांनी यावेळेस काढले. प्रशालेच्या या उत्तुंग यशाबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विणाताई जोशी, चेअरमन नानामालक कवठेकर, मानद सचिव सु.त्रि.अभ्यंकर व संस्थेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
या यशात शाळेतील सर्व इंग्रजी शिक्षक बंधू-भगिनींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, संपूर्ण इंग्रजी विभागाचे सध्या सर्वत्र मनापासून अभिनंदन होत आहे. या यशामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात कवठेकर प्रशालेचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने घेतले जात आहे व प्रशालेने आपली शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.























