सोलापूर – शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन लादुबाई गुलाबचंद तोष्णीवाल ट्रस्टच्या वतीने सोलापुरातील उच्च शिक्षण घेणाऱ्या २५ दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
भैरू रतन दमानी अंधशाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीद्वारे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला मोलाचा हातभार लावण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘डॉ. नवनीत हॉस्पिटल’सात रस्ता येथे करण्यात आले होते.
लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि तोष्णीवाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लुईब्रेल व शाम तोष्णीवाल यांच्या तैलचित्रास पुष्प हार अर्पण करण्यात आले, तोष्णीवाल भाभी यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व डॉ शाम तोष्णीवाल यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा जपत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
उच्च शिक्षण घेत असलेल्या २५ दृष्टीहीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टतर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.


























