सोलापूर : उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि प्रशिक्षण व रोजगार (टी अँड पी) सेल यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत ‘पीएलसी अँड स्काडा ऑटोमेशन ट्रेनिंग प्रोग्राम’ या उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतामधील उत्पादन, ऑटोमोबाईल, ऊर्जा, प्रक्रिया उद्योग, औषधनिर्मिती, सिमेंट, स्टील तसेच विविध औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रांमध्ये पीएलसी (प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर) आणि स्काडा (सुपरव्हायझरी कंट्रोल अँड डेटा अॅक्विझिशन) तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या अभियंत्यांना मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्ये प्राप्त व्हावीत, त्यांची रोजगारक्षमता वाढावी आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना Siemens व Allen-Bradley पीएलसी प्रोग्रामिंग, स्काडा डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग तसेच रिअल-टाईम इंडस्ट्रियल ऑटोमेशन अॅप्लिकेशन्सचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण अनुभवी उद्योगतज्ज्ञांकडून दिले जात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रणालींवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांच्या तांत्रिक कौशल्यांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
आजच्या औद्योगिक भरती प्रक्रियेत पीएलसी आणि स्काडा विषयातील प्राविण्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटसह देशातील नामांकित उद्योगांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी आणि आकर्षक वेतन पॅकेजेस मिळविण्यास निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.हा उद्योगाभिमुख उपक्रम विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि प्रशिक्षण व रोजगार (टी अँड पी) सेल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. अनंतराव व्ही. पाटील, विभागप्रमुख डॉ. विजयकुमार एस. बिरादार, सहसमन्वयक म्हणून प्रा. एम. टी. शिंदे यांनी काम पाहिले. हा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सक्षम, कौशल्यसंपन्न आणि रोजगारक्षम अभियंते घडविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Post Views: 10