
सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. यावेळी 616 पैकी 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान, एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांनी पोलीस बंदोबस्तात जेलमधून येत मतदानाचा हक्क बजावल्याने या निवडणुकीची विशेष चर्चा रंगली. बार्शी, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर येथील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली.
सर्व केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी कमांडो पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा नियोजन समितीत उभारलेल्या नियंत्रण कक्षातून सर्व मतदान केंद्रांचे थेट चित्रिकरण पाहत निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच आवश्यक सूचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या.

निवडणुकीत भाजपकडे मतदारसंख्या अधिक असल्याने विजयाचा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची बाजू मजबूत असल्याचे सांगितले. तर खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आमच्या मतदारांची अदृश्य शक्ती निर्णायक ठरेल, असा दावा केला. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. मतदान केंद्रांवर भाजप मतदारांची एकजूटमतदानासाठी भाजपचे सदस्य चार-पाच जणांच्या गटाने मतदान केंद्रांवर येताना दिसत होते. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. दक्षिण सोलापूरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची एकजूट पाहायला मिळाली. २२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा नियोजन भवन येथे सहा टेबलांवर दोन फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार असून निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
विरोधक आणि सत्ताधारी एकाच बाकावर!
उत्तर सोलापूर मतदान केंद्रावर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष महेश गादेकर हे एकाच ठिकाणी बसून गप्पा मारताना दिसले. निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय सौहार्दाचे हे चित्र लक्षवेधी ठरले.
चौकट
मतदानासाठी सहा केंद्रांवर व्यवस्था
सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे एकूण ६०० हून अधिक मतदार या निवडणुकीत मतदानासाठी पात्र होते. मतदारांना देण्यात आलेल्या मतपत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतनाना देशमुख यांचे नाव प्रथम क्रमांकावर, तर भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते.
























