सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सोलापूरच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पार पडावी यासाठी केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्षांसाठी मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, मतपत्रिकांचे रंग, मतदारांची ओळख पडताळणी, मतदानाची पद्धत तसेच मतपेट्या सीलबंद करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक पॅनेलसाठी दोन मतदान प्रतिनिधी नियुक्त करण्याची तरतूद असून, त्यापैकी एक प्रतिनिधी मतदान केंद्रात उपस्थित राहणार आहे. मतदान प्रतिनिधींनी निवडणूक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेत आक्षेप घेताना निर्धारित पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मतपत्रिकांसाठी स्वतंत्र रंग निश्चित करण्यात आले आहेत. विकास संस्था प्रतिनिधींसाठी पांढरी, महिला प्रतिनिधींसाठी गुलाबी, अनुसूचित जाती-जमाती सदस्यांसाठी निळी, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय सदस्यांसाठी पिवळी मतपत्रिका राहणार आहे. शेतीमाल प्रक्रिया संस्थांशी संबंधित मतदारांसाठी लाल छपाईची निळ्या कागदावरील, तर इतर शेतकी संस्थांसाठी लाल छपाईची पिवळ्या कागदावरील मतपत्रिका देण्यात येणार आहे. नागरी सहकारी बँका, पतसंस्था व अन्य संबंधित संस्थांसाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका असेल.
प्रत्येक मतदान केंद्रामध्ये तीन मतदान कक्ष उभारण्यात येणार आहेत. मतदाराने मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर ओळखपत्राची पडताळणी केली जाईल. मतदार यादीतील नाव, अनुक्रमांक आणि आवश्यक तपशील तपासून संबंधित मतदाराला त्याच्या प्रवर्गानुसार मतपत्रिका देण्यात येईल. मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावून मतदानाची नोंद केली जाणार आहे.
मतदान करताना मतपत्रिकेवर विहित जागी शिक्का मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतपत्रिका योग्य प्रकारे दुमडून मतदान पेटीत टाकावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतपत्रिकेवर विहित पद्धतीव्यतिरिक्त अन्य खूण करू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेत आक्षेप नोंदविण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ओळखीबाबत हरकत घेतल्यास संबंधित प्रतिनिधीने ५० रुपये रोख रक्कम जमा करणे, मतदाराच्या नावाची नोंद घेणे आणि आक्षेपाबाबत आवश्यक पुरावे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच अंध व अपंग मतदारांसाठी सोबतीची सुविधा देण्याबाबतही मार्गदर्शक सूचना आहेत.
मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपत्रिका, वापरलेले साहित्य आणि संबंधित कागदपत्रे निर्धारित पद्धतीने सीलबंद करून जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि मतदान प्रतिनिधींनी या सूचनांचे पालन करावे, असे मार्गदर्शक पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे.