सोलापूर – शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे संचलित कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चॅम्प चेस स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेने १५ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय खुली व मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी आकर्षक खेळाचे प्रदर्शन करत विजयी सुरुवात केली.
कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूर शहरासह अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी व माढा आदी तालुक्यांतील २८ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह १७८ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन वि. मो. मेहता माध्यमिक शाळेचे नियामक मंडळ सदस्य सुरेशबाबु मंकणी व मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. यावेळी सोलापुर सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी , राष्ट्रीय पंच संतोष पाटील, क्रीडा शिक्षक अमित कोर्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत प्रमुख पंच वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा-राठी, प्रशांत पिसे, विजय पंगुडवाले, प्रज्वल कोरे, यश इंगळे, चंद्रशेखर बसरगीकर आदी काम पाहत आहेत.
मुलांच्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू श्रेयस कुदळे, नचिकेत तोंडले, देवदत्त पटवर्धन, आदिराज म्हेत्रे, विवान दासरी, श्रेयश इंगळे, हर्षद म्हस्के, विवान राठोड, प्रणव मजगे, आयुष जानगवळी, नैतिक होटकर, वेदांत पांडेकर तसेच मुलींच्या गटात बार्शीची राष्ट्रीय खेळाडू सानवी गोरे, पृथा ठोंबरे तसेच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अनन्या उलभगत, प्रतीक्षा चाबुकस्वार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत शानदार विजय मिळविला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या चार मुले व मुलींची निवड सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धा अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत असून उपस्थितांना अनेक प्रेक्षणीय लढती पाहण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Post Views: 181