
सोलापूर – पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत जीवनशैली आणि औषधी वनस्पतींचे आरोग्यासाठी होणारे फायदे यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने, मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे डॉ. कोटणीस मेमोरियल रेल्वे रुग्णालय, सोलापूर येथे ‘औषधी वनस्पती प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात औषधी वनस्पतींच्या सुमारे ५५ विविध प्रकारांचा समावेश होता, ज्याद्वारे अभ्यागतांना आयुर्वेदिक/औषधी वनस्पतींचा समृद्ध वारसा आणि पर्यावरण संवर्धन यांबाबत मोलाची माहिती मिळाली. प्रत्येक वनस्पतीसोबत तिचे शास्त्रीय नाव, औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी होणारे फायदे यांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते, ज्यामुळे अभ्यागतांना त्यांचे महत्त्व सविस्तरपणे समजण्यास मदत झाली.
प्रदर्शनात तुळस, गुळवेल (गिलोय), कोरफड (अलोवेरा), अश्वगंधा, कडुनिंब, अडुळसा आणि लेमनग्रास यांसारख्या आरोग्यदायी व औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या वनस्पतींचा समावेश होता. वनस्पतींसोबतच माहितीपूर्ण तक्ते आणि पोस्टर्सही लावण्यात आले होते, ज्यातून त्यांचा औषधी उपयोग आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात आले. पारंपरिक औषधी उपाय आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेतील त्यांची भूमिका यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन एक प्रभावी माध्यम ठरले.
हे प्रदर्शन दिवसभर अभ्यागतांसाठी खुले ठेवण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, तर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे कर्मचारी, रुग्ण व सामान्य नागरिक उपस्थित होते.





















