सोलापूर : विष्णुपंत तथा तात्यासाहेब कोठे यांची ८९ वी जयंती सोमवारी जीवन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान संचलित विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे ज्येष्ठांचा सन्मान व संस्कारांचा अभिमान कार्यक्रमांतर्गत आजी-आजोबांचे पाद्यपूजन हा अतिशय कौतुकास्पद अन भावस्पर्शी कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे चरण पूजन करून आशीर्वाद घेतले. या उपक्रमाचे पालकांनी तसेच विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी कौतुक केले. जयंतीनिमित्त शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी, दंड साखळी व कराटे यांचे प्रशिक्षण, व्याख्यान, दंत तपासणी, मेंटल हेल्थ अवेअरनेस शिबिर, आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर आदी उपक्रमही राबविण्यात आले. याप्रसंगी आत्मतृप्ती योजनेच्या डब्यांचे पूजन करून त्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, सिद्धेश्वर कमटम, दर्शन पटेल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राधिका चिलका, मोनिका कोठे, रमेश यन्नम, मुख्याध्यापिका पुष्पा नायर, श्रीनिवास म्याडम पंतलु तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
संस्कार आणि सन्मानाची रुजवण पुढील पिढीत होण्याकरिता पाद्यपूजन
आजी आजोबा म्हणजे कुटुंबाच्या संस्कारांची शिदोरी असते. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन मायेची ऊब आणि आशीर्वाद हे पुढच्या पिढीच्या जडणघडणीचे अमूल्य आधार असतात. आजी आजोबांच्या तसेच आई-वडिलांच्या प्रति मुलांमध्ये सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. संस्कार आणि सन्मानाची रुजवण पुढील पिढीत होण्याकरिता पाद्यपूजन कार्यक्रम झाला.
– देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य






















