अक्कलकोट – किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना अक्कलकोट तालुक्यात उघडकीस आली आहे. विहिरीत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचा छडा लावत अक्कलकोट उत्तर पोलिसांनी अवघ्या १८ तासांत खुनाचा उलगडा करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दि. ७ ऑगस्ट रोजी गौरीशंकर भरमशेट्टी यांच्या किणी रोडलगत्या शेतातील विहिरीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. मृताच्या हातावरील गोंदणाच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ओळख सागर श्रीशैल व्हनचेंजे (वय २७, रा. दहीटेवाडी, ता. अक्कलकोट) अशी पटली. मृताच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पोलिसांना खुनाचा संशय आला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टच्या रात्री करंजा चौक येथे सागर व्हनचेंजे याचा आरोपी श्रुती यारोळे, नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून तिघांनी सागरला किणी रोड परिसरातील शेतात नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली. सागर मद्यधुंद झाल्यानंतर नागनाथ बनसोडे याने त्याचे हात पकडले, बाळू शिंदे याने पाय धरले, तर श्रुती यारोळे हिने मोठा दगड डोक्यात घालून त्याचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिघांनी मिळून मृतदेह विहिरीत फेकला. ६ ऑगस्ट रोजी सकाळी मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या १८ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट राजेंद्र टाकणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार, स.पो.नि. अमोल पन्हाळकर, पो.हे.कॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, असिफ शेख, गणेश अंगुले, ज्योती मोरे, श्रीकांत जवळगे, केदारनाथ सुतार, महादेव शिंदे, विजयलक्ष्मी शिवुर यांचे पथकाने केली.
Post Views: 17