पंढरपूर – शिक्षण क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग आणि विदयार्थ्यांवर संस्कारक्षम परंपरा जपणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या ‘कवठेकर प्रशाला, नाथ चौक ‘ या शाळेच्या शैक्षणिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे, सोलापूर यांच्यावतीने या प्रशालेला ‘आदर्श शाळा’ हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार केवळ एक सन्मान नसून, शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या गुणात्मक प्रगतीची आणि निष्ठेची पोचपावती आहे. “बदलत्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शाश्वत विद्यादानाचे’ व्रत ज्या जिद्दीने या प्रशालेने विद्यार्थ्याप्रती समर्पित केले त्या सर्व घटकांच्या प्रयत्नांचे प्रत्यंतर आहे. व ते खरोखरच कौतुकास्पद आहे. “असे मत प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील व्यक्त केले आहे.
तर या पुरस्काराबद्दल बोलताना पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र.पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात “शाळेमधून विद्यार्थी विकासासाठी अखंडपणे तेवत राहणारे प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे परमेश्वराइतकेच पवित्र आहेत,त्या पवित्र पूजेचे परमेश्वराने दिलेले हे फळ आहे ” अशा हृदयस्पर्शी भावना व्यक्त करून शाळेच्या कार्याचा गौरव केला आहे.
या पुरस्काराबद्दल कवठेकर प्रशालेने प्रस्थापित केलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी दिलेले योगदान यामुळे हा पुरस्कार शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे. या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रशालेच्या या पुरस्काराबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानामालक कवठेकर,चेअरमन श्रीमती वीणाताई जोशी, मानद सचिव सु.र.पटवर्धन, सु.त्रिं.अभ्यंकर व सर्व सन्माननीय सदस्य यांनी प्रशालेतील सर्व घटकांनी हार्दिक आनंद व्यक्त केला असून पालक वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
———————-
चौकट : ( भोसे येथे पुरस्कार सोहळा )
शाळेच्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, ५ जुलै २०२६, सकाळी १०:३० वाजता, रायगड लॉन्स, भोसे, ता.पंढरपूर येथे होणार आहे.
Post Views: 31