सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाला (घरवापसी) यंदा तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. २ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ निमित्त सोलापुरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता अशोक चौक येथील लोटस मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांचे विधीवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा सन्मानाने हिंदू समाजात स्थान दिल्याचा ऐतिहासिक संदर्भ सांगितला. या घटनेच्या स्मरणार्थ समाजात वैचारिक जागृती घडविण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात श्रीक्षेत्र तुळजापूरचे महंत मावजीनाथ, सुनील घनवट, सामाजिक विश्लेषक सर्वेश मेंहदळे, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे धर्माधिकारी प्रसाद पंडित तसेच हिंदुराष्ट्र सेनेचे रवी गोणे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला राजन बुणगे, आनंद मुसळे, रवी गोणे आदी उपस्थित होते.
Post Views: 14