सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यात बागलवाडी येथे युवकाने ईव्हीएम मशिन पेटविले. जळालेल्या ईव्हीएममध्ये ४१० मते असून ही मते सुरक्षित आहेत. मतांची साठवणूक कंट्रोल युनिटमध्ये होते.त्या युवकाने बॅलेट युनिट जाळले, निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून ही आग नष्ट केली. दुसरे मतदान यंत्र जोडून बागलवाडीतील मतदान प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक दोन येथील मतदान केंद्रावर एका तरुणाने सायंकाळी ५ च्या सुमारास मतदानाला आल्यानंतर ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मशिन हातोडाने फोडण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये व्हीव्हीपॅट मशिनचे नुकसान झाले असून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सुरक्षित आहेत. त्या देखील युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून या दोन्ही घटनेतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्याचा व जाळण्याचा प्रयत्न झाला.