सुरत, 7 जुलै (हिं.स.) – येथील सचिन भागात सहा मजली इमारत कोसळल्यानं शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. १२ तासांपासून अधिक काळ बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान एका महिलेला वाचविण्यात यश आले असून बचावपथकाकडून ढिगारा हटविण्याचं काम सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बिल्डींग काही वर्षे जुनी होती. त्यानंतर त्यामध्ये १० ते १५ कुटुंब राहत होते. शनिवारी अचानक मोठा आवाज आला आणि बिल्डींग पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिसरात सर्वत्र धुळीचे कण तयार झाले. नागरिकांची पळापळ सुरु झाली. संपूर्ण बिल्डींग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली.
बिल्डींग २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. केवळ सहा वर्षांत २०२४ मध्ये ती पडली. या बिल्डींगमध्ये मजुरी करणारे लोक बिल्डींगच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. महानगरपालिकेने यापूर्वीच घरमालकांना नोटीस दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरु होते. त्यावेळी एका महिलेचा आवाज आला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस ढिगाऱ्याखालून सुरक्षित काढले.
शहरात सहा मजली इमारत कोसळली. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहचली. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. परंतु ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, सुरत महापालिकेचे महापौर दक्षेश मावाणी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई, विरोधी पक्षनेत्या पायल साकारिया आणि अन्य नेतेही घटनास्थळी पोहोचले.