डावरगाव देवी शाळेत रंगली चिमुकल्यांची निवडणूक ..
मतदानाने निवडले शाळेचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री . विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव.
तभा वृत्तसेवा
विष्णु मगर
टेंभुर्णी / प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी चिमुकल्यांची निवडणूक रंगली. या उपक्रमशील शाळेत दरवर्षी शाळेचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निवडणुकीने निवडले जातात. सोमवारी शाळेत पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या निवडणुकीत खऱ्याखुऱ्या निवडणुकीप्रमाणे विद्यार्थ्यांनी निवडणुकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यात उमेदवारांचे नामांकन पत्र भरणे छाननी नामांकन पत्र मागे घेणे प्रचार प्रत्यक्ष मतदान या सर्व बाबी निवडणुकीप्रमाणेच घेण्यात आल्या. निवडणूक घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांतून मतदान अधिकारयांची एक टीम नियुक्त करण्यात आली होती. यात मतदारांचे नाव शोधणे, ओळख पटविणे बोटाला शाई लावणे व मतपत्रिकेवर प्रत्यक्ष मतदान करणे या सर्व बाबींचा अनुभव या चिमुकल्यांना देण्यात आला.
विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांतूनच पोलीस बनलेल्या विद्यार्थ्यांकडून मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानानंतर लगेच मतदान स्थळी मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या मतदान प्रक्रियेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक महेश अहिरे, आदर्श शिक्षक शेख जमीर, शिक्षक गोविंद जाधव, सुनील पवार, तुळसिदास जाधव, रत्ना देशमुख, रिबिका साने आदींनी पुढाकार घेतला.
चौकट-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची मिरवणूक या निवडणुकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यापैकी प्रतीक दीपक नवले याने मुख्यमंत्रीपदावर तर कल्याणी संतोष नवले हिने उपमुख्यमंत्री पदावर विजय मिळविला. निकालानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करीत नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याची शाळेच्या प्रांगणात मिरवणूक काढली. यावेळी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
डावरगाव देवी येथील ग्रामस्थ आपल्या विद्यार्थ्यांचा हा नियोजन बद्ध कार्यक्रम पाहून आश्चर्य व्यक्त केले.
यामध्ये मतदान निवडणूक अधिकारी म्हणून कातिक पाचे, समीक्षा नवले , शिवकन्या नवले ,किरण नवले यांनी तर सुरक्षा रक्षक म्हणून तेजल आढावे, वरद नवले यांनी काम पाहीले. मतमोजणी अधिकारी म्हणून गजानन नवले, मयुर मुळे व संघराज आढावे यांनी चोख जोबबादार पार पाडली.
प्रतिक्रिया –
प्रथामिक शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून आमच्या शाळेत दरवर्षी प्रत्यक्ष विद्यार्थी मंत्री मंडळाची निवड केली जाते… यासाठी विद्यार्थ्यांनी खर्याखुर्या निवडणूक प्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रचारांचा ही आनंद घेऊन सगळं अगदी मतदान चिन्ह आदींचा… वापरून करून मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
आदर्श शिक्षक शेख जमीर शेख अमीर प्रा. शा डावरगाव देवी