तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
आसाम येथील लेखवली डिव्हिजन मध्ये 556 ए एस सी बटालियन मध्ये कार्यरत असलेल्या व सध्या सुट्टीवर आलेल्या सैनिक अमोल भीमराव वय 32 वर्ष याचा गुरुवारी (ता.८) रात्री लघुशंकेसाठी बाहेर आला असता एक वाजता जिन्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
टेंभुर्णी येथील अमोल आढाव हा युवक 2014 मध्ये आर्मीत दाखल झाला होता नायक या पदावर कार्यरत असलेल्या सैनिक अमोल हा 556 ए एस सी या बटालियनमध्ये लेखवल्ली आसाम येथे कर्तव्य बजावत होता दरम्यान महिनाभराच्या सुट्टीसाठी तो गावी टेंभुर्णी येथे आलेला होता गुरुवारी तो परत कर्तव्यावर जाणार होता परंतु कर्तव्यावर जाण्या अगोदरच गुरुवारी रात्री एक वाजेच्या दरम्यान पाय घसरून जिन्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान डॉ .अमोल वाघ यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात जीवरेखा नदीकाठी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी मराठा मिडीयम रेजिमेंटचे कर्नल संदीप थपथियाल, ब्रिगेडियर वीरेंद्र सिंग, मेजर जनरल अनुराग वीज, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्यासह आमदार संतोष दानवे,तहसीलदार सारिका भगत ,गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, नायब सुभेदार संभाजी माने, सैनिक कार्यालयाचे जिल्हा कल्याण संघटक अशोक हिवाळे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक मुठे , सुधाकर दानवे, रमेश गव्हाड, रामधन कळंबे, संजय लहाने गौतम म्हस्के केशव जंजाळ, दीपक वाकडे , पुष्पाताई म्हस्के यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक पोलीस कर्मचारी व इतरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितानी पुष्पचक अर्पण करून मानवंदना दिली.
आई, पत्नी व भाऊ – बहिणींचा आक्रोश
2014 मध्ये आर्मीत दाखल झालेला अमोल हा कुटुंबातील सर्वात लहान भाऊ. अवघी वयाची 32 वर्ष पूर्ण झालेली. अमोल यांनी नवीन घराचे बांधकामही केलेले आहे दिवाळीला या घरात जाण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. अमोल अकाली निधनाने सर्वांना पोरका करून गेला यामुळे आई पत्नी व बहिणींच आक्रोश मन हेलावणारा होता.
अर्ध्यावरती डाव मोडीला…
सुखी संसाराची स्वप्न रंगवणारी सीमा आणि अमोल चे सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या संसार वेलीवर फुललेली दोन फुले तीन वर्षीय मुलगी हिंदवी व दुसरी आठ महिन्याची भक्ती. अमोल याला आपल्या कर्तव्यावर गुरुवारी जाणे असल्याने त्यांनी आई पत्नी व घरातील सदस्यांसाठी दोन दिवसापूर्वीच किराणा साहित्य व सर्व घरात लागणाऱ्या वस्तू आणून ठेवल्या होत्या . परंतु कर्तव्यावर जाण्या अगोदरच गुरुवारी रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले. मुलीना कळतही नसताना अमोलचे निधन झाल्याने संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडल्या गेल्याची भावना व्यक्त होत होती.