सोलापूर – “वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे हीच खरी सेवा” या भावनेतून आस्था रोटी बँकतर्फे एक हृदयस्पर्शी आणि भक्तिमय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर परिसरातील वृद्धाश्रमांतील आजी-आजोबांना तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूर या पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन आस्था रोटी बँकेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांनी केले. त्यांच्या प्रेरणेतून बँकेचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि वृद्धांसाठी संपूर्ण सहलीचे नियोजन, वाहतूक, भोजन व निवास यांची उत्तम व्यवस्था केली.
प्रवासादरम्यान फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना प्रेमाने सेवा दिली, त्यांच्यासाठी गरम चहा, नाश्ता, मध्यान्ह भोजन आणि पाण्याची सोय केली. प्रवासभर हास्यविनोद, भजन-कीर्तन आणि संवादांचा माहोल होता. वृद्धांनी आपले अनुभव सांगताना डोळ्यात आनंदाश्रू होते.
या प्रसंगी विजयकुमार छंचुरे म्हणाले, “आपले आयुष्य ज्यांनी आपल्यासाठी झिजवले, त्या वृद्ध पिढीला सन्मान, प्रेम आणि आनंद देणे हीच खरी मानवसेवा आहे. या आजी-आजोबांना देवदर्शनाची संधी देऊन त्यांच्या मनात समाधान आणि आत्मिक शांतता निर्माण करणे हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
या उपक्रमात बँकेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, चालक-कर्मचारी तसेच वृद्धाश्रमातील सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांनी मिळून हा उपक्रम आनंदमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पाडला.
यावेळी आस्था रोटी बँकेचे सदस्य छाया गंगणे, संगीता छंचुरे, विद्या सिंघम,विनोद भोसले, निसर्गा कुरकुट, समृद्धी छंचुरे, वासल्या आश्रम चे व्यवस्थापिका राधा शेटे मॅडम, मंगलदृष्टी निराधार आश्रम चे व्यवस्थापिका रजनी भाटिया मॅडम व आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे या सर्वांचे खूप मोठे योगदान लाभलेले आहे.

















