सोलापूर : विजापूर रोडवरील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राणीसंवर्धन, प्राण्यांच्या आरोग्य सुविधा आणि पर्यटकांच्या सोयीसुविधा यांना प्राधान्य देऊन कामे जलदगतीने पूर्ण करावीत. संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना दोन्ही कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी
दिले.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत व्हेटरनरी हॉस्पिटल बांधकामाचे तसेच एनटीपीसी सीएसआर निधीतून सुरू असलेल्या चार पिंजऱ्यांचे बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वीणा पवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, उपअभियंता अविनाश वाघमारे, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर,
अभियंता चेतन प्रचंडे, अभिजीत बिराजदार तसेच प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना दोन्ही कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. त्यांनी प्राणीसंग्रहालयातील प्राणीसंवर्धन, प्राण्यांच्या आरोग्य सुविधा आणि पर्यटकांच्या सोयीसुविधा यांना प्राधान्य देऊन कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना केली.
सोलापूर महापालिकेच्या वतीने प्राणीसंग्रहालयाचा विकास आणि प्राण्यांच्या आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विविध योजनांद्वारे कामे हाती घेतली जात असून, नागरिकांना लवकरच याचा लाभ होणार आहे, असे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी स्पष्ट केले.


















