हिंगोली – काँग्रेसचे माजी आमदार डॉ संतोष टारफे यांनी शनिवारी भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईक यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे स्थानिक नेतेही उपस्थित होते. डॉ संतोष टारफे यांच्या भेटीमुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे कळमनुरीत भाजपची ताकद वाढणार आहे
काँग्रेसचे कळमनुरी विधान सभेचे आमदार डॉ संतोष टारफे यांनी काँग्रेस मधील अंतर्गत कलहामुळे उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकीत शिंदे सेनेचे संतोष बांगर यांना कडवी झुंज दिली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. परंतु मागील काही काळापासून त्यांनी उबाठा शिवसेनेच्या कार्यक्रमाला तसेच आंदोलनाकडे पाठ फिरवली होती.
उध्दव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्यांची अनुपस्थिती जाणवली. त्यामुळे विविध चर्चांना उधान आले होते. शनिवारी भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचा हिंगोली दौरा होता. भारतीय जनता पक्षाच्या बैठकीनंतर माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची भेट घेतली.
यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांची भाजप नेत्यांशी झालेली बैठक ही चर्चेचा विषय बनली असून डॉक्टर टारफे हे आदिवासी नेते असून स्वच्छ आणि बेदाग चारित्र्य असलेले आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. कळमनुरी शहरासह तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून डॉक्टर टारफे यांचे या भागामध्ये चांगलेच वर्चस्व आहे.
आगामी नगरपरिषद निवडणूक आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये डॉक्टर टारफे यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला हिंगोली आणि कळमनुरी या दोन्हीही मतदारसंघांमध्ये मोठे बळ मिळणार आहे. शिंदे सेनेचे आमदार संतोष टारफे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर टारफे यांनी कडवी झुंज दिली होती.



















