मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील 4 हजार 741 बाधीत शेतकर्यांनी अद्यापही केवायसी पुर्ण न केल्याने त्यांचे अनुदान मध्येच लटकते राहिले असून सदर शेतकर्यांनी तात्काळ केवायसी पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन महसूल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
यंदा पावसाळी हंगामात ऑगस्ट महिन्यात झालेला सततचा पाऊस तर सप्टेंबर मध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे हाता तोंडास आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान शासनाने शेतकर्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला असून त्या प्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जावून पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे केले. नुकसानग्रस्त शेतकर्यांनी फार्मर आयडी करणे, केवायसी पुर्ण करणे आदी महत्वाचे असून सध्यमितीला 4 हजार 741 शेतकर्यांनी केवायसी पुर्ण न केल्यामुळे त्यांचे अनुदान मध्येच लटकले आहे. केवायसी पुर्ण झाल्याशिवाय शासनाचे अनुदान खात्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात आले. सदर शेतकर्यांनी ऑनलाईन केंद्रात अथवा संबंधीत सजेच्या तलाठ्याशी संपर्क साधून केवायसी पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे 59 हजार 730 शेतकर्यांचे 42 हजार 242 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनास कळविले आहे. दरम्यान 36 हजार 861 शेतकर्यांचे फॉर्म अपलोड करण्यात आलेले आहेत. झालेल्या नुकसानीपोटी 38 कोटी 51 लाख 76 हजार एवढी मागणी करण्यात आली असून आजअखेर 30 हजार 587 शेतकर्यांच्या 31 कोटी 46 लाख 27 हजार 132 एवढी रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगण्यात आले.























