बदनापूर / जालना – बदनापूर भारताच्या संविधानाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया घालणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याला विनम्र अभिवादन करण्याचा हा दिवस विशेष मानला जातो.
तसेच, २६/११ मुंबई हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाल्याने या भीषण दहशतवादी घटनेत शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याच औचित्याने आर.पी. इंग्लिश स्कूल, बदनापूर येथे संविधान दिन विशेष उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली.
सांस्कृतिक विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांनी हा दिवस संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांनी उद्देशपत्रिकेचे (Preamble) वाचन करत नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची माहिती दिली. देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषांमधून ‘विविधतेत एकता’ हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला. तसेच मनोगत, भाषणे, नृत्य सादरीकरण आणि विद्यार्थ्यांनी साकारलेल्या संविधान दिनानिमित्त आकर्षक चित्रांचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
श्री विज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. भरत लक्ष्मणराव भांदर्गे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संविधानाचे महत्त्व व नागरिक म्हणून आपली जबाबदारी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार मलिक सर उपस्थित होते. त्यांच्यासह इतर विभागाचे मुख्याध्यापक श्री एम. जी. बेग, मुख्याध्यापिका सौ. मनीषा सूर्यवंशी मॅडम, तिन्ही विभागांचे उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संविधान दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


















