पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी नव्या पिढीने पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित ज्येष्ठ
साहित्यसेवकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. रविवारी, मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कृतज्ञता सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते.
कार्यकारी मंडळातील ज्येष्ठ वाङ्मयसेवकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या सोहळ्यात बोलताना प्रमुख पाहुणे भारत सासणे म्हणाले, “साहित्य ही समाजाचा आत्मा आहे. मसापने आजपर्यंत अनेक साहित्य चळवळींना दिशा दिली आहे. आज ज्या ज्येष्ठ साहित्य सेवकांचा सत्कार झाला आहे, त्यांचे कार्य नितांत आदरास पात्र आहे. त्यांनी निष्ठेने केलेली साहित्यसेवा नवीन पिढीसाठी आदर्श आहे.”
सासणे पुढे म्हणाले, “मराठी भाषेची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. केवळ लेखन नाही, तर वाचनाची संस्कृती वाढीस लागावी. साहित्य सेवकांच्या योगदानातूनच मराठी साहित्याची ऊर्जा टिकून राहिली आहे.”
अध्यक्षीय समारोप करताना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी साहित्यसेवेला ‘साधना’ असे संबोधले. ते म्हणाले, “साहित्यसेवा ही एक साधना आहे, जी भाषेवर आणि संस्कृतीवर असलेल्या निस्सीम प्रेमातून सिद्ध होते. ज्येष्ठ वाङ्मयसेवकांनी आपल्या अनुभवाने आणि कार्यनिष्ठेने मसापच्या कार्याला नवी दिशा दिली आहे. मसाप ही संस्था केवळ जुन्या परंपरेचे संरक्षण करत नाही, तर नवोदितांना व्यासपीठ देऊन मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे काम करत आहे.” असे सांगून प्रा. जोशी यांनी नव्या पिढीला भाषिक मुळांशी जोडून राहण्याचे आणि साहित्याचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात कार्यकारी मंडळातील ज्येष्ठ वाङ्मयसेवक सर्वश्री रवींद्र बेडकिहाळ फलटण, प्रा. सोपानराव चव्हाण पाटण, प्राचार्य तानसेन जगताप चाळीसगाव, डॉ. शशिकला पवार वर्धा, पद्माकर शिरवाडकर ठाणे, डॉ. सतीश देसाई पुणे, ॲड. जे. जे. कुलकर्णी सोलापूर, रावसाहेब पवार सासवड, चंद्रकांत पालवे अहिल्यानगर, आणि प्रकाश देशपांडे रत्नागिरी, यांचा भारत सासणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याचवेळी फलटणचे अमर शेंडे लिखित ‘सह्याद्रीची सावली’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापाचे प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी केले तर मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि यांनी आभार प्रदर्शन केले. हा कृतज्ञता सोहळा मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या परंपरेला जपणारा ठरला.
या समारंभाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्यातील सर्व कार्यवाह सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे, राजन लाखे, पुरुषोत्तम काळे, यांच्यासह सर्व जिल्ह्याचे प्रतिनिधी यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————



















