बार्शी – समाजात शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच समाजाची ओळख व्हावी ही त्याची धारणा असावी. नैतिक मूल्यांची रुजवणूक करुन विद्यार्थ्यांना नागरिक घडवणे हे त्याचे आद्य कर्तव्य असते. विद्यार्थी विकासातून समाजनिर्मितीचे कार्य शिक्षकांच्या हातून घडत असते, असे मत प्रा.डॉ. राहुल पालके यांनी मांडले. येथील किसान कामगार विद्यालय उपळाई ठोंगे, बार्शी येथे झालेल्या गटचर्चेत ते बोलत होते.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुहास वाघमारे, ग्रंथपाल माधव टिपरसे, प्रा. डॉ. विजयकुमार भांजे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.पालके म्हणाले, सध्या विद्यार्थीमन अत्यंत वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांचा कल व आवड समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्याच्या आशा-आकांक्षा, आवडीचे विषय व करिअरचे विविध मार्ग याची जाण विद्यार्थी म्हणून शिक्षकांनी समजून सांगणे गरजेचे आहे.
पुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासपूरक व अभ्यासेतर घटकांची तसेच तंत्रस्नेही शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यांना गुणवत्ता विकासाबरोबरच भावनिक बुद्धिमत्ता हा घटक समजून देणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासपूरक उपक्रम अधिकाधिक कसे राबवता येतील यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी समाजमन संवेदनशील असणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक घडामोडी बरोबरच सामाजिक व सांस्कृतिक घटकांची माहिती अवगत करून देणे गरजेचे आहे. संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री वाघमारे यांनी शिक्षकांच्या कार्याविषयी चर्चा करीत असताना त्यांनी गुरुजी व्हावे यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.
याकरिता त्यांच्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षक सदैव प्रयत्न करीत राहील त्यासाठी त्याला विविध पातळीवर सहकार्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.या चर्चेसाठी गवळी सर, इतर शिक्षक, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.


















