किनवट : मौजे आंदबोरी (ता. किनवट, जि. नांदेड) येथे दिनांक १३ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह उत्सवात किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव केराम यांनी दिलेली सदिच्छा भेट दिली. याच वेळी “आपले गाव – हरित व स्वच्छ गाव” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जमा केलेल्या निधीतून गावाच्या प्रमुख मार्गावर दुतर्फा ५० नारळाची झाडे व इतर १० झाडे, अशी एकूण ६० झाडे लावण्यात आली. झाडांच्या संरक्षणासाठी ग्रीन नेट बसविण्यात आले असून त्यांची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या हरिभक्त परायण ह. भ. प. नारायण महाराज महादापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी आमदार भिमराव केराम यांची प्रमुख उपस्थिती होती. कीर्तनातून भक्ती, एकात्मता व समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. आमदार केराम यांनी कीर्तनाचा आस्वाद घेत उपस्थित भाविकांशी संवाद साधत गावकऱ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.
अखंड हरिनाम सप्ताहात केवळ भक्ती उपक्रमच नव्हे तर प्लास्टिकमुक्त सप्ताह, ग्रामस्वच्छता अभियान यांसारखे सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. प्लास्टिक साहित्याचा वापर टाळून गावकऱ्यांनी स्वतःची भांडी आणून भोजन केल्याने पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेला. ग्रामस्वच्छता अभियानात संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले.
या सर्व उपक्रमांमध्ये गावचे सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी वर्ग, भजनी मंडळ, महिला मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवक मित्र मंडळ, आंदबोरी यांनी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम घेतले.
आमदार भिमराव केराम यांच्या उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह भक्ती, सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धन यांचा आदर्श संगम ठरला असून परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

























