माढा : शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या मल्टीपर्पज हॉलचे स्लॅब कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने याच्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरीही पाच ते सहा कामगार जखमी झाले असून त्यातील एका कामगाराला सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की माढा शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून यामध्ये ४५x१०० फूट अंतराच्या आणि २६ फूट उंचीच्या मल्टीपर्पज हॉलचे टाकण्याचे काम सुरू होते. सकाळी दहा वाजता काम सुरू झाले होते. सायंकाळी चार वाजण्याचे सुमारास संपूर्ण स्लॅब भरत आल्यानंतर अचानक हा स्लॅप कोसळला .यावेळी चहा आल्याकारणाने चहा पिण्यासाठी कामावर असणाऱ्या २०ते २५ कामगार चहा पिण्यासाठी खाली आले होते. यामुळे पाच ते सहा कामगारच वरती होते. हे सर्वजण सोबत खाली कोसळले .सुदैवाने मोठी जीवितहानी न होता सर्वजण जखमी झाले. सर्वांना प्राथमिक उपचारासाठी माढा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिका जयश्री आव्हाड तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली.
हा अपघात समजतात माढा शहरातील गणेश साळुंखे , विशाल कानगे, सचिन बनसोडे ,भोला पाचंगे, नागनाथ मारकड आदी सह इतर तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्लॅब मध्ये अडकलेल्या संबंधित कामगारांना बाहेर काढत रुग्णालयात पोहोचवले.यावेळी प्रा शिवाजीराव सावंत यांचे सह माढा शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून धीर दिला.
यापैकी ठेकेदार संभाजी बागल यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
चौकट…..
केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीतून महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारती अंतर्गत आय के एस मल्टीपर्पज हॉल बांधकाम सुरू आहे. आज याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते .हे काम सुरज लोंढे आणि संभाजी बागल या ठेकेदारांना दिले आहे .स्लॅब चे काम पूर्ण होत असतानाच अंतिम क्षणी हा स्लॅब कोसळला. या पाठीमागे स्लॅबच्या खाली दिलेला आधार कमी पडला असावा असा अंदाज असून महाविद्यालयाकडून संबंधित व्यक्तींना ठेका दिलेला आहे .या कामासह नुकसानीची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे.
…..
प्रा. घनश्याम हराळे प्रभारी प्राचार्य माढा महाविद्यालय.
























