नायगांव – तालुक्यातील मरवाळी तांडा येथील बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रम शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.
वाडी–तांडा परिसरातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मुले शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात यावीत
, या उद्देशाने कै. वसंतराव नाईक यांनी शैक्षणिक संकुलाची संकल्पना राबवली. या संकल्पनेतून या समाजातील विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत आहेत.
प्राचार्य विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित या कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राचार्य किशन राठोड, धोंडीबा तेलंग, नागनाथ पा. येल्लूरे, सूर्यकांत जाधव, आनंदराव सूर्यवंशी,गुणवंत कुंदूर्के, शेख मुजमिल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहशिक्षक आनंदराव सूर्यवंशी, प्राचार्य विजयकुमार देशमुख तसेच माजी प्राचार्य किशन राठोड यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
निरोप समारंभाचे औचित्य साधून विद्यार्थिनी रुपाली नावंदे, दूर्गैश्वरी वजीरगावे, अश्विनी जाकोरे व समिक्षा बालाजी भेंडे कर यांनी शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपले भावपूर्ण मनोगत सादर केले. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांचे मन हेलावून गेले.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे शाळेला सरस्वती देवीची मूर्ती भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी रुपाली नावंदे हिने केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका अश्विनी जाकोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



















