सोलापूर : सामाजिक जाणीव आणि विकासाचा समतोल साधत सोलापूरचे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान भेटीने केली. माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. उद्यान परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करत पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला.
काल शुक्रवारी बिनविरोध निवड झाल्यानंतर आज नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी सकाळी थेट न्यू बुधवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला भेट दिली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अजित गायकवाड तसेच कामगार नेते अशोक जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.
नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानास भेट दिली. जयंतीनिमित्त त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी कामाची सुरुवात केली. यावेळी उद्यान परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता, सुशोभीकरण आणि दर्जेदार कामाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
महापौरांनी उद्यानात उपस्थित मॉर्निंग ग्रुपच्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. उद्यान परिसरात उभारण्यात येत असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी करत स्वच्छता, सुशोभीकरण व कामाच्या दर्जाबाबत स्पष्ट निर्देश दिले. उद्यानात नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागाचा
आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी : कोंड्याल
माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा व त्यागाचा आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे स्थळ आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे, असे महापौर कोंड्याल म्हणाले.
नूतन महापौरांचा पहिला दिवस
— पहिल्याच दिवशी डॉ. आंबेडकर उद्यानास भेट
— माता रमाई आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण
— पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी
— स्वच्छता व सुशोभीकरणाबाबत सूचना
— सार्वजनिक स्वच्छालय उभारणीसाठी निर्देश
— मॉर्निंग ग्रुप नागरिकांशी थेट संवाद

















