सांगोला – तालुक्यातील वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावरील पुरातन महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. येथे माण, कोरडा आणि अपरूपा या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी पात्रात मुबलक पाणी उपलब्ध आहे. निसर्गरम्य परिसर आणि वाहत्या पाण्यामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले असून महाशिवरात्रीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रावण महिना, महाशिवरात्र आणि प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची मांदियाळी असते. या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक वैजीनाथकाका घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नदी पात्रात आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचे मोठे कार्य सातत्याने राबवले जात आहे. त्यांच्या या कार्याचे भाविकांकडून कौतुक होत आहे. तसेच महाशिवरात्रीनिमित्त देवस्थान समितीच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
चैतन्य हास्य योग मंडळाची निसर्ग सहल
महाशिवरात्रीचे औचित्य साधून सांगोला येथील चैतन्य हास्य योग मंडळा तर्फे या त्रिवेणी संगम परिसरात एकदिवसीय निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ.कृष्णा इंगोले, प्रा.राजेंद्र ठोंबरे, बाळासाहेब वाघमारे, भीमाशंकर पैलवान, नारायण विसापूरे, भाऊसाहेब पवार, सुधाकर म्हेत्रे, जयसिंग खडतरे, गजानन खडतरे, सुभाष महिमकर, शंकर डोंबे, सुरेश कांबळे, देवदत्त केदार, विश्वेश्वर कोठावळे, जयंत तेली तसेच महिला सदस्य मंगल इंगोले, स्मिता इंगोले, गंगुबाई पवार यांनी सहभाग नोंदवला.






















