सोलापूर – महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. रीहान अन्सारी या मुस्लिम तरुणाचा वाढदिवस आणि महाशिवरात्री हा योग एकाच दिवशी आल्याने त्याने वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.
श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या आबालवृद्ध भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करून रीहानने आपला वाढदिवस साजरा केला. उपवासाच्या दिवशी खिचडीचा प्रसाद वाटण्याचा संकल्प करत त्याने सुमारे वीस किलो साबुदाणा खिचडी तयार केली. आपल्या हिंदू आणि मुस्लिम मित्रांना सोबत घेत मंदिर परिसरात आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आजच्या काळात धर्मभेद आणि जातीय तणावाच्या घटना घडत असताना रीहान अन्सारी याने दाखवलेला हा सामाजिक संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. “आपला वाढदिवस महाशिवरात्रीला आला, याचा आनंद आहे. या दिवशी उपवास करणाऱ्या भाविकांना खिचडी वाटप करून वाढदिवस साजरा करावा, असे मनात आले. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना यातून व्यक्त करायची होती,” असे रीहान अन्सारी यांनी सांगितले.
या उपक्रमात अजित गव्हाणे, मोसिन अन्सारी, राहुल साळुंखे, सचिन पवार यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. भाविकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत रीहानचे अभिनंदन केले. महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा झालेला हा वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदापुरता मर्यादित न राहता सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला. श्रद्धा, सेवा आणि बंधुभाव यांचा संगम घडवणारी ही घटना सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
चौकट
रिहान अन्सारी या तरुणाने हिंदू मुस्लिम ऐक्याची नवी परिभाषा महाशिवरात्रीच्या महापर्वकाळात सर्वांना दाखवून दिली आहे. आजच्या या जमान्यात जातिभेद धर्मभेद वाढत असताना अन्सारी याने उचललेले नवे पाऊल सर्वांना दिशादर्शक ठरणार आहे. महाशिवरात्री आणि आपला वाढदिवस असा हा योग कधी नव्हे तो एकत्रित आल्याने त्याचे सार्थक करायचे असे अन्सारी याने ठरवले. त्यानुसार आपल्या हिंदू मुस्लिम मित्रांना एकत्र करत अन्सारी याने सुमारे वीस किलोची साबुदाणा खिचडी तयार करून मंदिर परिसरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या आबालवृद्ध तसेच महिला भाविकांना वितरित केली. रिहान अन्सारी याने आपला वाढदिवस अशा पद्धतीने सादर केल्याने त्याची भूमिका आदर्शवत ठरली असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.























