मंद्रूप – येथील कपिलसिध्द मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे चार वाजता मंदिराचे पुजारी करबसय्या स्वामी यांच्या हस्ते मल्लिकार्जुन देवाच्या मूर्तीचा विधीवत महाभिषेक करण्यात आला.
पहाटे सहा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या. मंद्रूप व परिसरातील सुमारे पाच हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या निमित्ताने कपिलसिध्द मल्लिकार्जुन युवक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमोद नडविनंगळ यांनी रांगोळीच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंगांचे आकर्षक चित्र साकारले होते, ज्याचे भाविकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवपुत्र जोडमोटे, सातप्पा जोडमोटे, रेवणसिध्द जोडमोटे, बाळासाहेब जोडमोटे, रमेश जोडमोटे, विजय जोडमोटे, कुमार जोडमोटे, महेश लिंबितोटे, नागेश माळी, शंतनु जोडमोटे, निलेश जोडमोटे, सुयेश स्वामी, शेखर स्वामी, विशाल ख्याडे, विरेश जोडमोटे आदींनी परिश्रम घेतले.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.





















