मोडनिंब – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये माढ्यात भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना विधानपरिषद सदस्यपदाची संधी देण्यात यावी, अशी मागणी उदय माने यांनी केली. मोडनिंब (ता.माढा) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष संघटन तसेच निवडणूक कामगिरीचा आढावा घेत ही मागणी केली.
यावेळी माने यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली असून पंचायत समितीवरही पक्षाने सत्ता मिळवली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जिल्हा परिषदेत ४ जागा आणि पंचायत समितीत ११ जागा जिंकण्यात यश आले. या विजयात शिंदे यांचे नियोजन, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे संघटन महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिल्यास पक्षसंघटना अधिक मजबूत होईल तसेच विकासाला गती मिळेल,”असे मत माने यांनी व्यक्त केले.संबंधित स्तरावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून शिष्टमंडळ निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


























