पंढरपूर – एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला,नाथ चौक, पंढरपूरच्या वतीने उमंग सप्ताहाला नुकताच प्रारंभ झाला.कार्यक्रमाचा प्रारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही वाय पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविकात प्रशालेची ही सांस्कृतिक परंपरा असून विदयार्थ्यांना उत्तम संस्कारा व परस्पर सहयोगासाठी उपयोगी असल्याचे नमूद केले.
प्रशालेचे ज्येष्ठ इंग्रजी विभाग प्रमुख एन. जी. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तद नंतर कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे,पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानामालक कवठेकर,सचिव सु.र.पटवर्धन, संस्था सदस्य माननीय डॉक्टर मिलिंद जोशी एस. पी. कुलकर्णी, संजय कुलकर्णी व भारत विकास परिषदेचे कार्यवाह शामराव उकिडवे यासर्वांचा सत्कार मा. मुख्याध्यापकांचे हस्ते करण्यात आला.यानंतर सर्व विदयार्थी -शिक्षकांचे व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांच्या गीत गायनास प्रारंभ झाला. यामध्ये दहा गाणी एकाचवेळी जवळपास एक हजार ६०० विद्यार्थ्यांनी अत्यंत सुश्राव्यतेने,एक सुर व तालामध्ये, अत्यंत उत्स्फूर्तपणे, तन्मयतेने व उस्फूर्तपणे गाऊन सर्व श्रोत्यांची वाहवा मिळवली. यावेळी प्रशालेचा आसमंत जणू आनंदाने भरून वाहत होता. सर्व अभ्यागत हे अत्यंत
सुश्राव्य ठरलेल्या गायन वर्षामध्ये चिंब न्हाऊन व भारावलेले गेले होते. आपल्या मनोगतपर भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी आपल्याला या कार्यक्रमांमधून अत्यंत आनंद झाला असून विद्यार्थ्यांवर उत्तमोत्तम संस्कार, ज्ञान व परंपरा जपणारी शाळा म्हणून आवर्जून उल्लेख केला व आशा उपक्रमांची उत्तम राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत गरज आहे असे गौरवोद्गार काढले.
यावेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना कंठ दाटून आला होता. त्यानंतर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सु. र. पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रशालेच्या या उपक्रमद्वारे एक उत्तम व जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी प्रशाला सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमातील सर्व मान्यवारांचे आभार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ एस एस विश्वासे यांनी मानले तर कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीताने झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा बिराजदार यांनी केले तर निवेदन सौ प्राजक्ता अडसूळ यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व पंढरपूरमधील प्रतिष्ठित नागरिक, पालक बंधु -भगिनी व निमंत्रित आवर्जून उपस्थित होते.





















