सोलापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य, पायाभूत सुविधा व नागरिकांच्या मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात येईल, अशी ग्वाही नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्यावतीने नूतन महापौर तथा रुग्णालयाचे संचालक विनायक कोंड्याल यांच्या महापौरपदी निवडीबद्दल त्यांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना महापौर कोंड्याल बोलत होते. याप्रसंगी ते पुढे म्हणाले की, मार्कंडेय सहकारी रुग्णालयाशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली व चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांच्या हस्ते विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय कर्मचारी पतसंस्था, इरप्पण्णा बोल्ली ब्लड बँक तसेच डॉक्टरवर्ग यांच्यातर्फेही सत्कार करण्यात आला.
रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली म्हणाले, विनायक कोंड्याल यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीपूर्ण आणि सर्वसमावेशक आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमतेला चालना मिळेल. शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महापौर म्हणून ते निश्चितच विशेष प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी सुरेश फलमारी, अशोक आडम, डॉ. विजयकुमार आरकाल, श्रीनिवास क्यातम, श्रीनिवास कमटम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, डॉ. लता पाटील, डॉ. सुधाकर गुंडेली, डॉ. अंधारे, डॉ. सुहास पुजारी, डॉ. सांभारभं आदी उपस्थित होते.व्हाईस चेअरमन रमेश विडप यांनी आभार मानले.
























