पंढरपूर – ऐरव्ही वेगवेगळ्या रंगीबेरंगातील सुंदर रेशमी,भरजरी पोशाखात दिसणारे विठ्ठल आणि रुखुमाई वसंतपंचमी पासून केवळ पांढऱ्या रंगाच्या पोशाखातच दृष्टीस पडतात. त्याचे कारण देखील अनोखे आणि वेगळे असे आहे. कारण वसंतपंचमीच्या मुहुर्तावर विठ्ठल रखुमाईचा शाहीविवाह सोहळा संपन्न होतो आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने विठुरायाच्या रंगपंचमीला सुरुवात होत असते. त्यामुळेच साधारण एक महिना म्हणजेच वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात विठ्ठल आणि रखुमाईमाता आपणाला केवळ पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भरजरी वस्त्रातच दिसुन येतात.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या रुपाचे वर्णन वेगवेगळ्या संतमहात्म्यांनी आपआपल्या पध्दतीने आपआपल्या अभंगातून केलेले आहे. मुळातच राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या विठुरायाच्या रुपाची मोहिनी सातासमुद्रापार वर्णिली जात आहे. अगदी ज्ञानोबा,तुकाबोराया सारख्यां संतमहात्म्या पासून ते जगतगुरु शंकराचार्यापर्यंत आणि तेथून अगदी सर्वसामान्य वारकरी भक्तांपर्यंत विठुरायाच्या रुपाचे गारुड सर्वांच्या मनावरच बिंबलेले आहे.
येथील मंदिरात अगदी पहाटे पासून ते सायंकाळ पर्यंत विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे विधीवत उपचार सुरु असतात. त्यामध्ये दररोज दुपारी विठ्ठल आणि रखुमाईला वेगवेगळ्या रंगाचे रेशमी वस्त्रे परिधान केली जात असतात. ऋतुमाना नुसार विठ्ठल,रखुमाईचे खान,पान तसेच महावस्त्रां मध्ये देखील बदल केले जात असतात. मात्र ऐरव्ही मंदिरात वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी महावस्त्रे परिधान केलेले विठ्ठल आणि रखुमाई वसंतपंचमी पासून केवळ पांढऱ्या रंगाच्या भरजरी महावस्त्रांमध्येच दिसुन येतात.
कारण वसंतपंचमी या विठ्ठल रखुमाईच्या विवाह सोहळ्या दिवसा पासून विठ्ठलाच्या रंगपंचमीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. वसंत पंचमी ते रंगपंचमी अशी महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी सुरु असते. या काळात दररोज मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईला पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करुन त्यावर गुलाल,केशराची ऊधळण केली जाते. त्यामुळे मंदिरातील प्रथा,परंपरेनुसार विठुरायाला संपुर्ण महिनाभर केवळ पांढऱ्या रंगाचा पोशाखच परिधान केला जातो. या पांढऱ्याशुभ्र महावस्त्रा मध्ये किंवा पोशाखा मध्ये सुध्दा मुळातच विठ्ठलाचे लोभस असलेले रुप अधिकच मोहक आणि आकर्षक दिसते.
———————-
गुलाबदाणीतून शिंपडले जाते गुलाबपाणी
वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत विठुरायाला पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात येत असतो. या काळात दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. यावेळी गुलाबदाणीतून विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मुर्तींवर गुलाबपाणी देखील शिंपडले जाते. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत म्हणजे जवळपास एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरु राहणार. या रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभ काही दिवसापूर्वी संपन्न झालेल्या वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला. त्यामुळे वसंतपंचमी पासून सावळा विठूराया आणि रुक्मिणीमाता पांढ-या शुभ्र वेषात दिसता आहेत.
























