सोलापूर – माळशिरस तालुक्यातील दहीगाव जिल्हा परिषद सदस्यपदी माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते यांची निवड झाल्याबद्दल माळशिरस येथील श्री राम निवास येथे ‘ईच्छा भगवंताची मित्रपरिवार’च्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
विजयाबद्दल आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ चे भाजप नगरसेवक किसन जाधव, युवा नेते चेतन नागेश गायकवाड, उमेश जाधव, शरदराव शिंदे, माणिक कांबळे, यल्लप्पा शहापूरे तसेच मित्रपरिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देत आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी माजी आमदार राम सातपुते यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. किसन जाधव यांच्या हस्ते त्यांना टोपी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सत्कार समारंभात सातपुते कुटुंबीयांविषयी अभिमान आणि विश्वास व्यक्त करण्यात आला. संस्कृती सातपुते यांनी मतदारांचे आभार मानत दहीगाव परिसराच्या विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या विजयामुळे परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

























