सोलापूर – गंगामाई हॉस्पिटल परिसरात नर कुत्र्याच्या टेस्टिकल (अंडाशय)ला अज्ञात व्यक्तीने रबर अडकविल्याची माहिती प्राणिमित्र सुरेश कांबळे यांनी ॲनिमल राहत सोलापूरच्या आपत्कालीन क्रमांकावर दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर स्नेहा सुरवसे यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली.
डॉ. स्नेहा सुरवसे यांनी ही माहिती अजित मोटे यांना देत त्वरित घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. अवघ्या पंधरा मिनिटांत पथक घटनास्थळी दाखल झाले. सदर कुत्र्याची पाहणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. भूल दिल्यानंतर टेस्टिकल ला घट्ट अडकलेले रबर अत्यंत काळजीपूर्वक काढण्यात आले. त्यानंतर या कुत्र्यास पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी कार्यालयात हलविण्यात आले.
सध्या त्याची प्रकृती स्थिर असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या संपूर्ण बचावकार्यात पशुवैद्यकीय अधिकारी आकाश जाधव, डॉ. स्नेहा सुरवसे, अजित मोटे आणि विजय चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले. ॲनिमल राहतच्या सतर्कता आणि तातडीच्या प्रतिसादामुळे कुत्र्याचे प्राण वाचवण्यात यश आले. प्राणिमात्रांवरील अशा अमानुष कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“मुक्या प्राण्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक आहे. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारचे अमानुष कृत्य करणे हे मानवतेला काळिमा फासणारे आहे. सुदैवाने ॲनिमल राहतच्या टीमने तात्काळ प्रतिसाद दिल्यामुळे शॉनचे प्राण वाचले. आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की, अशा घटना दिसल्यास त्वरित माहिती द्यावी आणि प्राण्यांप्रती संवेदनशीलता ठेवावी. मुक्या जीवांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
– पप्पू जमादार, प्राणीमित्र

























