सोलापूर – श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट यार्ड येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हमाली, तोलाई आणि स्त्री हमाली दरात ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, व्यापारी संघटना, कामगार प्रतिनिधी आणि कामगार संघटनांनी संयुक्तरीत्या सहभाग नोंदवला. सर्वानुमते दरवाढ मंजूर करण्यात आली असून माथाडी कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सुधारित दरानुसार, प्रति क्विंटल हमालीचा दर ७ रुपये ९० पैशांवरून ३० टक्के वाढीसह १० रुपये २७ पैसे झाला आहे. प्रति पिशवी हमाली दर आता १ रुपये ५६ पैसे असणार आहे. तोलाई दर ४ रुपये ७० पैशांवरून ६ रुपये ११ पैसे करण्यात आला आहे. तसेच स्त्री हमाली दरातही ३० टक्के वाढ करून प्रति पिशवी दरात ३६ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
बाजार समितीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच हे सुधारित दर लागू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. व्यापारी आणि कामगार यांच्यात समन्वय साधत घेतलेला हा निर्णय बाजारातील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
याबैठकीस संचालक प्रथमेश पाटील, गफार चांदा, वैभव बरबडे, सचिव रजपूत, माजी संचालक शिवानंद पुजारी, भुसार व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्काळी, तसेच व्यापारी प्रतिनिधी आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवाढीमुळे कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया कामगारांकडून व्यक्त करण्यात आली.























