सोलापुर – डॉ. कोटणीस यांच्या जीवनचरित्रावरील “देवदूत” या कादंबरीचे लेखक डॉ. संजीव शहा(भंडारकवठेकर) यांनी जैन साहित्यावर लिहिलेल्या दोन ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले आहे. दिगंबराचार्य प्रज्ञाश्रमण देवनंदीजी यांच्या जीवनचरित्रावरील “सर्वोदयी राष्ट्रसंत” या हिंदी भाषेतील एक हजार पृष्ठसंख्या असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते नाशिक जवळील ‘ णमोकार तीर्थ’ या क्षेत्रावरील पंचकल्याणक प्रसंगी संपन्न झाले. या प्रसंगी आचार्य कुंथुसागर महाराज, आचार्य देवनंदीजी महाराजांसह अनेक दिगंबर आचार्य, मुनीसंघ, आर्यिकामाताजी, ब्रह्मचारी पंडीतजी व विशाल जैन जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राज्याचेअन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ ही उपस्थित होते.
डॉ. संजीव शहा यांनी आचार्य शांतिसागर महाराज यांच्या जीवनावर पंडित सुमेरूचंद्र दिवाकर यांनी लिहिलेल्या “चारित्र चक्रवर्ती” या हिंदी ग्रंथाचा मराठीत केलेला अनुवाद सोलापुरच्या जीवराज जैन ग्रंथमाला या भारतातील प्राचीन, सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या शुभहस्ते पद्मपुरा-जयपूर या तीर्थक्षेत्रावर पंचकल्याणक समयी संपन्न झाला. यावेळी जैन सिद्धांत ग्रंथ ‘धवला’ याच्या १५ व्या भागाचा अनुवाद जो अकलूजच्या बा.ब्र. रेवतीताई दोशी यांनी मराठीत केला आहे, त्याचेही विमोचन संपन्न झाले.
प्रकाशनापूर्वी जैन सिद्धांत ग्रंथ ‘धवला’ व ‘चारित्र चक्रवर्ती’ या ग्रंथांचे पूजन करून हत्तीवरून धार्मिक ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जीवराज जैन ग्रंथमालेचे अध्यक्ष श्रीमान शेठ श्री. अरविंद रावजी दोशी, विश्वस्त अनुप दोशी, संतोषभाई शहा, बा.ब्र. रेवतीताई दोशी, सौ. जोती शहा व अनेक मान्यवर उपस्थित होते.
जैन तत्त्वज्ञानाचा, भ. महावीरांनी सांगितलेल्या अहिंसा तत्त्वांचा प्रचार व प्रसार सर्व देशात व्हावा यासाठी मराठी व अन्य स्थानिक भाषांतून त्यांचा अनुवाद होणे गरजेचे आहे, असे उद्गार आचार्य वर्धमानसागर महाराजांनी या प्रसंगी व्यक्त केले. मोक्षमार्गाकडे वाटचाल करण्यासाठी अशा ग्रंथांचे वाचन, स्वाध्याय होणे गरजेचे आहे असे महाराजांनी प्रवचनातून सांगितले आहे.
डॉ. संजीव शहा हे सोलापुरातील जैन साहित्यिक असून साहित्य क्षेत्रात तसेच जैन समाजातर्फे त्यांचे सर्व क्षेत्रात अभिनंदन होत आहे.
























