अक्कलकोट – आज पर्यंत क्रीडा क्षेत्रात अतोनात संघर्ष करून जीवन जगलो आहे. संघर्षमय काळात नकारात्मकता ही अनभवलो आहे. पण आज जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा असल्याचे मनोगत मुंबई कुर्ला येथील स्वस्तिक मंडळ क्लब तथा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक, प्रो.कब्बडी लीग (सीझन १ ते ४) बंगाल योद्धा संघाचे व दबंग दिल्ली ५ वा सीझन संघाचे कॅप्टन तसेच बीच गेम २०१० सालाचे सुवर्णपदक विजेता निलेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी निलेश शिंदे यांचा सपत्निक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी निलेश शिंदे बोलत होते. पुढे बोलताना निलेश शिंदे यांनी मोठ्या भक्तीभावाने आज श्री स्वामी दर्शन घेतले आहे. स्वामींच्या दर्शनाने शांती आणि समाधान मिळाले आहे. हे समाधान घेऊन वारंवार स्वामींनी आपणास दर्शनाकरीता बोलावून उपकृत करावे असेही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, दर्शन घाटगे, ओंकार महाडिक, तुषार मोरे, धनराज स्वामी, प्रविण शिंदे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

























