बार्शी – शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अध्यापिका विद्यालय बार्शी येथे कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोमनाथ देंडे तर अध्यक्ष म्हणून प्रा. बजरंग वाघमोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व कुसुमाग्रज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य जीवन लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये कविता सादरीकरण, मराठी गीत सादरीकरण, चारोळी वाचन, भाषण, चित्रपट समीक्षा, पुस्तक समीक्षा, निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक इत्यादीचा समावेश होता.
सुजाता आचलेरे यांनी हे राष्ट्र देवतांचे हे गीत सादर केले, श्रद्धा चव्हाण यांनी शिवगर्जना सादर केली, मनीषा उंबरे, महेक बागलकोटे, सिद्धी जाधवर व सीमा सोनवणे यांनी राज्यगीत सादर केले. आम्रपाली माने व अनुजा बुऱ्हाडे यांनी लाभले आम्हास भाग्य हे गीत सादर केले, सय्यद तंजीला यांनी शिखर तो उंच हे गीत सादर केले. गौरी घोलप व प्रतीक्षा भोगे यांनी ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत सादर केले, मोनिका धुमाळ व राधिका बदले यांनी हीच आमुची प्रार्थना ही प्रार्थना सादर केले.
प्रतीक्षा अवताडे, ऋतुजा अवताडे, तेजश्री तरटे, ऋतुजा कागदे, अलिशा मुलानी, निकीता पळसे, मानसी गिराम, सानिका मगर यांनी विविध मराठी कविता सादर केल्या. तसेच अश्विनी पाटील, पल्लवी गिराम, प्रियंका सुरवसे यांनी चारोळ्या सादर केल्या.
साक्षी देशमुख यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटावर समीक्षा सादर केली, दिव्या क्षीरसागर यांनी पुस्तक समीक्षा सादर केली. तसेच ऋतुजा अवताडे, मृणाल जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सोमनाथ देंडे व अध्यक्ष प्रा. बजरंग वाघमोडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. अशोक घुले व प्रा. प्रमोद मांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुभाष माळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रतिकांत हामणे यांनी केले.



















