सांगोला – नव्याने उभारण्यात येणारी विधीज्ञ कक्ष ही नूतन इमारत न्यायालय, विधीज्ञ व पक्षकार यांचेमधील दुवा म्हणून भविष्यकाळामध्ये काम करणार आहे. न्यायव्यवस्था अधिक जलद व गतिमान करणेसाठी न्यायालयाशी संबंधीत प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निजामोद्दीन जमादार यांनी केले. ते दिवाणी न्यायालय, क.स्तर, सांगोला येथे उभारण्यात येणा-या विधीज्ञ कक्षाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला, सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश मनोज एस.शर्मा, तसेच महाराष्ट्र आणि गोवा वकिल संघटनेचे सदस्य अॕड.मिलिंद थोबडे, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॕड.एम.एन.ढाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत औक्षण करुन हलगी व तुतारीच्या निनादामध्ये करण्यात आले. यावेळी सांगोला विद्यामंदीरच्या इ.८ वी.मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. प्रास्ताविकात अॕड.एम.एन.ढाळे यांनी सांगोला तालुक्याकरीता गतिमान न्यायव्यवस्था होण्यासाठी आणखी न्यायालयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. मनोगतात अॕड.मिलिंद थोबडे यांनी सांगोला विधीज्ञ संघाच्या आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांनी न्यायव्यवस्थेमध्ये पक्षकार हा केंद्रबिंदू मानून न्यायव्यवस्थेतील सर्व घटकांनी तसेच विधीज्ञ यांनी काम करावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिवाणी न्यायालय, सांगोलाचे सह.दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील व विधीज्ञ संघाचे सदस्य अॕड.गजानन एल.भाकरे यांनी केले. आभार विधीज्ञ संघाचे जेष्ठ सदस्य अॕड.उदय शि.घोंगडे यांनी मानले. याप्रसंगी सांगोला तालुका व परिसरातील सर्व विधीज्ञ, नागरिक, पक्षकार तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर व सांगोला न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला दिवाणी न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी, सह.दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील, २ रे दिवाणी न्यायाधीश एस.एस.साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला न्यायालयाचे सर्व कर्मचारी, विधीज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

























