सोलापूर – कासेगाव ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी कुलदीप जंगम (सीईओ, जिल्हा परिषद सोलापूर) यांनी कासेगावला सदिच्छा भेट दिली. ही पाहणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या अनुषंगाने करण्यात आली.
ग्रामपंचायतीचे सरपंच यशपाल वाडकर यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. सीईओ जंगम यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरांची तपासणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
१५० वर्षांच्या शाळेचा गौरव सोहळा
कासेगाव जिल्हा परिषद शाळेला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त शाळा, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निमंत्रण देण्यात आले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सरपंच यशपाल वाडकर यांनी दिली.सीईओ कुलदीप जंगम यांनी सरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह शाळेच्या इमारतीची पाहणी केली. तसेच शिक्षकांकडून शाळेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
सर्वांगीण विकासाकडे वाटचाल
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून कासेगाव ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
























