बार्शी – सायकलिंग क्लबचा सायकलपटू सुरज मुंढे याने पुन्हा एकदा आपल्या जिद्द, चिकाटी आणि कर्तृत्वाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ऑडॅक्स क्लब पॅरिसियन अंतर्गत पी.सी.एम.सी. सायक्लीस्ट क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुणे–बासर–पुणे १२०० कि.मी. अंतराच्या एलआरएम (लाँग राईड मॅरेथॉन) स्पर्धेत सुरजने ८३ तास ३२ मिनिटांत यशस्वीरित्या अंतर पूर्ण करत ‘चॅलेंज लेपरेटल’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पात्रता मिळवली आहे.
या एलआरएममध्ये देशातील १२ व रशियातील १ अशा एकूण १३ सायकलपटूंनी सहभाग नोंदविला होता. सर्व स्पर्धकांना १२०० कि.मी. अंतर निर्धारित ९० तासांत पूर्ण करणे अनिवार्य होते. दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता हडपसर येथील सोजस पॅलेस येथून अल्ट्रामॅन श्री. दशरथ जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात झाली.
स्पर्धेदरम्यान आयोजकांकडून ठराविक अंतरावर ११ तपासणी नाके ठेवण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धकाने नियमांचे काटेकोर पालन करत निश्चित वेळेत या तपासणी नाक्यांवर पोहोचणे बंधनकारक होते. अति उष्ण वातावरण, वेगवान वारे, काही ठिकाणी कडाक्याची थंडी, मोठी उड्डाणपुले, तसेच सततचे चढ-उतार अशा विविध आव्हानांना सामोरे जात आहार व झोपेचे नियोजन सांभाळत ही स्पर्धा पूर्ण करणे ही खऱ्या अर्थाने सहनशक्तीची परीक्षा होती.
सुरज मुंढे याने सर्व अडचणींवर मात करत आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध नियोजनाने ही एलआरएम ८३ तास ३२ मिनिटांत पूर्ण केली. याआधी देखील त्याने १२०० कि.मी.च्या तीन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून ही स्पर्धा त्याच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरली. या यशामुळे त्याची ‘चॅलेंज लेपरेटल’ या नामांकित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड होणार असून बार्शी सायकलिंग क्लबच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व यशस्वी सायकलपटूंना क्लबतर्फे पुष्पगुच्छ, पगडी, पदक व मेडल हँगर देऊन सन्मानित करण्यात आले.आपल्या या यशाचे श्रेय सुरजने आपल्या मार्गदर्शक व प्रशिक्षक, कुटुंबीय आणि सायकलिंग क्षेत्रातील मित्रांना दिले असून पुढील काळातही अशाच स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा त्याचा निर्धार आहे.






















