अक्कलकोट – सीमावर्ती भागातील विद्यार्थिनींना स्वर्गीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी शिक्षणाची द्वारे खुली केली त्यामुळे विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे असे आवाहन महिला विकास कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून करण्यात आले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ शितल झिंगाडे-भस्मे, मधुबाला लोणारी, शितल फुटाणे, हर्षदा गायकवाड उपस्थित होते.
प्रा मधुबाला लोणारी म्हणाल्या की, शिवणकाम, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाइनिंग, बेकरी, संगणक प्रशिक्षण, डिजिटल मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रांत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.
प्रा हर्षदा गायकवाड म्हणाल्या की, डिजिटल युगात ऑनलाइन कौशल्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाइनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, ऑनलाइन ट्यूशन, डेटा एंट्री यांसारख्या कामांमधून विद्यार्थिनी घरबसल्या रोजगार मिळू शकतात. इंटरनेटच्या माध्यमातून देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी देखील मिळते
प्रा शितल फुटाणे म्हणाले की, अन्न प्रक्रिया उद्योग, लोणची-पापड तयार करणे, दुग्ध व्यवसाय, बँकिंग अकाउंटिंग डिजिटल सेवा यांसारख्या क्षेत्र विद्यार्थिनींना खुले आहे. त्यामुळे कौशल्याधारित शिक्षण घेऊन विद्यार्थिनींनी रोजगारच नाही तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजात मानाचे स्थान मिळवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्राध्यापिका डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले तर आभार प्रा जनाबाई चौधरी यांनी मानले.
कौशल्य विकास कार्यशाळेस विद्यार्थिनींची लक्षवेधी उपस्थिती
महिला विकास कक्ष विभागाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेस विद्यार्थिनींची लक्षवेधी उपस्थिती होती.
फोटो ओळ
जागतिक महिला दिनानिमित्त कौशल्य विकास कार्यशाळेत सहभागी प्राध्यापिका व विद्यार्थी

















