जेऊर – महिला दिनानिमित्त लग्नसमारंभात कर्तुत्ववान महीलांचा सन्मान,डीजेचा कर्णकर्कश आवाजाला फाटा देत वरातीपुढे टाळ मृदंगाच्या तालावर ठेका धरणारे बाल वारकरी अन् हा सोहळा कुतुहलाने पाहाणारे वऱ्हाडी मंडळी उपस्थित सर्व महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाची भेट देऊन साजरा झालेल्या या खातगाव ता करमाळा येथील रणसिंग परिवाराचा आगळा वेगळा विवाह सोहळ्याची करमाळा तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू असून हा सोहळा इतरांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे .
करमाळा तालुक्यातील खातगाव येथील गणसिंग परिवार हा वारकरी संप्रदायिक विचाराने प्रभावित असणारा परिवार असून 8 मार्च रोजी या परिवारातील राजेंद्र रणसिंग यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यात त्यांनी वरातीसाठी कर्णक्य आवाजातील डीजे बँजो याला फाटा देऊन टाळ मृदंगाच्या तालावर मुखात हरीनाम घेणारे वारकरी सहभागी झाले होते या परिवाराने महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आवर्जून महिला दिनाची तारीख निवडली होती या दिवशी करमाळा तालुक्यातील व परिसरातील दहा कर्तत्ववान महिलांना सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन सन्मानित केले या सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राजा मानेॲड बाबुराव हिरडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना रणसिंग परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. रणसिंग परिवाराच्या वतीने आपल्या लाडक्या मुलीच्या विवाह सोहळ्यात राबवलेल्या विशेष उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू असून हा विवाह सोहळा इतरांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे.






















